
गुंतवणूकदारांचे २.७७ लाख कोटींचे नुकसान
नवी दिल्ली, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ याचा मोठा परिणाम आज जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजारातही सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. मात्र, त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून काही प्रमाणात सावरत व्यवहाराची सांगता केली. दिवसअखेर सेन्सेक्स ३७३.९३ अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घसरून ७६,५७०.३५ अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये १४१.३५ अंकांची म्हणजेच ०.५९ टक्क्यांची घसरण होऊन तो २३,९१४.४५ अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्सची सुरुवात ४७२.९६ अंकांच्या घसरणीसह ७६,४७१.३२ अंकांवर झाली. सुरुवातीच्या विक्रीमुळे तो काही वेळातच ८०८.५६ अंकांनी घसरून ७६,१३५.७२ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७६,५०५.४० अंकांपर्यंत सावरला. मात्र, त्यानंतर पुन्हा विक्रीचा दबाव निर्माण झाला. दुपारनंतर आणि विशेषतः शेवटच्या टप्प्यात खरेदी वाढल्याने निर्देशांकाने नीचांकी पातळीवरून चांगली सुधारणा केली.
निफ्टीची सुरुवात १९७.८० अंकांच्या घसरणीसह २३,८५८ अंकांवर झाली. सुरुवातीच्या विक्रीमुळे तो २३,७८६.८० अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदी वाढल्याने निफ्टी २३,८८४.९५ अंकांपर्यंत पोहोचला. अखेरच्या अर्ध्या तासातील खरेदीमुळे निफ्टीने काही प्रमाणात नुकसान भरून काढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, माहिती-तंत्रज्ञान आणि भांडवली वस्तू क्षेत्राला मोठा फटका बसला. निफ्टी वाहन निर्देशांक १.७९ टक्के, माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक १.२५ टक्के, तर बीएसई भांडवली वस्तू निर्देशांक १.०८ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, तेल-वायू आणि धातू क्षेत्रातील समभागांना खरेदीचा आधार मिळाला. बाजारातील घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४८९.४२ लाख कोटी रुपयांवरून कमी होऊन ४८६.६५ लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.७७ लाख कोटी रुपयांची घट झाली.
दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,५७६ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार झाले. यापैकी १,९१४ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,४२८ शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर २३४ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार झाला नाही. त्याचप्रमाणे, आज एनएसईमध्ये ३,२२१ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार झाले. यापैकी, १,२१४ शेअर्स नफा कमावून हिरव्या रंगात (वाढ) बंद झाले आणि २,००७ शेअर्स तोटा सहन करून लाल रंगात (घट) बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १० शेअर्स नफ्यासह आणि २० शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी १४ शेअर्स नफ्यात आणि ३६ शेअर्स तोट्यात बंद झाले.
दिवसभराच्या व्यवहारानंतर, शेअर बाजारातील प्रमुख शेअर्सपैकी, कोल इंडिया ४.०५ टक्के, अदानी पोर्ट्स १.५३ टक्के, अदानी एंटरप्रायझेस ०.९७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.९१ टक्के आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (टीएमपीव्ही) ०.८९ टक्क्यांनी वाढून आजच्या टॉप ५ गेनर्सच्या यादीत सामील झाले. दुसरीकडे, आयशर मोटर्स ३.२४ टक्के, विप्रो २.५४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.१२ टक्के, बजाज ऑटो १.८७ टक्के आणि एशियन पेंट्स १.८६ टक्के घसरून आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्या ५ कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule