
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी उपक्रम ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.शाश्वत आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अणुऊर्जा विभागाचे कृषी क्षेत्रातील योगदान
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या (DAE) तज्ज्ञांनी कृषी आणि अन्न तंत्रज्ञान क्षेत्रात आधुनिक अणुतंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली.
न्यूक्लियर ॲग्रीकल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजनचे सायंटिफिक ऑफिसर ‘जी’ डॉ.विनोद ढोले यांनी पिकांच्या सुधारित आणि रोगप्रतिकारक वाणांची निर्मिती तसेच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी अणुतंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग केला जातो,याची सविस्तर माहिती दिली.अन्न तंत्रज्ञान विभागाचे सचिन हजारे यांनी रेडिएशन तंत्रज्ञानाच्या वापरावर प्रकाश टाकला.या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नधान्य आणि फळांची साठवणूक क्षमता वाढविणे, अन्नसुरक्षा अधिक सक्षम करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत ‘केव्हीके’चा दुवा
कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) शास्त्रज्ञ डॉ.सचिन सूर्यवंशी यांनी ‘कृषी विस्तार सेवांच्या प्रसारात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रयोगशाळेतील वैज्ञानिक संशोधन आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यातील अंतर कमी करून आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि पीकपद्धती थेट शेतापर्यंत पोहोचविण्यात कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचा दुवा आहे. संस्थेच्या क्षमता निर्मिती उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांचा कशाप्रकारे लाभ दिला जातो,याची माहितीही त्यांनी दिली.
मधुमक्षिकापालनातून उत्पन्नवाढीचा मार्ग
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (CBRTI) प्रशिक्षण समन्वयक राहुल काळे यांनी शास्त्रीय पद्धतीने बॉक्स मधमाशीपालन आणि फुलोरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले.प्रशिक्षण आणि सूक्ष्मदर्शकीय परागकण विश्लेषणाच्या माध्यमातून शुद्ध मधाचे उत्पादन घेणे शक्य होते. त्याचबरोबर मधातील भेसळीवर नियंत्रण मिळविता येते.त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादनासह उत्पन्नवाढीची संधी उपलब्ध होते,असे काळे यांनी सांगितले. याच सत्रात लातूर येथील मधपाळ ज्ञानेश्वर मलिले यांनी आपला अनुभव मांडला. CBRTIच्या सहकार्याने त्यांनी ‘लातूर मधुशाळा’ तसेच ‘भगीरथ मधु केंद्र’ उभारले असून,या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार आणि जनतेतील
माहितीचा दुवा ‘पीआयबी’
पीआयबी पुणे येथील माध्यम व संचार अधिकारी हर्षल आकुडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात पीआयबीची भूमिका तसेच पत्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा आणि योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
लाभार्थ्यांनी सांगितली बदलाची कहाणी
कार्यशाळेत केवळ योजनांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शनच नव्हे,तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अनुभवांनाही स्थान देण्यात आले.जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रघुनाथ जाधव तसेच ‘लखपती दीदी’ अनिता देवकडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.शासनाच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि त्यातून झालेल्या बदलांविषयी अनुभव सांगत त्यांनी योजनांबाबत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस पीआयबी मुंबईचे माहिती सहायक एडगर कोएल्हो यांनी उपस्थित मान्यवर,तज्ज्ञ वक्ते आणि माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे व प्रादेशिक व स्थानिक शासनमान्य वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis