
मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.)। गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता (DEI) या क्षेत्रातील शाखा गोदरेज डीईआय लॅबने 'इंडिया इंक्लूडेड ऑन कॅम्पस' या डीईआय-केंद्रित अनोख्या केस स्टडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. भारतातील आठ प्रमुख व्यवस्थापन संस्थांपर्यंत या स्पर्धेचा विस्तार करत, दुसऱ्या आवृत्तीमध्ये आयआयटी बॉम्बे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षीच्या केस स्टडी स्पर्धेचा मुख्य विषय महिलांसाठी रिटर्नशिप कार्यक्रम हा आहे; यात विद्यार्थ्यांना अशा व्यावहारिक उपाययोजना विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे लग्न, मातृत्व किंवा कुटुंबातील सदस्यांची देखभाल अशा कारणांमुळे करिअरमधून ब्रेक घेतलेल्या महिलांना पुन्हा कामावर परतणे शक्य होईल.
“द मिसिंग हाफ” (2026) या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, भारतातील ७४% सुशिक्षित महिलांनी त्यांच्या कारकिर्दीत कधी ना कधी करिअरमधून ब्रेक घेतला आहे. असे असूनही, अनुभवी महिलांना कार्यक्षेत्रात पुन्हा प्रवेश करण्यासाठीचे मार्ग मर्यादित आहेत, यामुळेच कंपन्यांसाठी प्रतिभावान कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या चर्चेत रिटर्नशिप्स (कामावर परत येणारे कर्मचारी) हा एक महत्त्वाचा भाग बनतो आहे. महिलांना त्यांच्या कारकिर्दीच्या विविध टप्प्यांवर आधार देणारे मार्ग कंपन्या कसे तयार करू शकतात, याचा विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि व्यापकपणे वैविध्यपूर्ण कार्यस्थळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनावर काम करणे, हा या आव्हानाचा उद्देश आहे.
गोदरेज डीईआय (DEI) लॅबचे प्रमुख आणि क्विरीस्तान या पुस्तकाचे लेखक परमेश शहानी म्हणतात: जेव्हा करिअरमध्ये वेगवेगळी वळणे येतात, तेव्हा काय घडते याचा विचार केल्याशिवाय आपण यातील महिलांच्या सहभागाबद्दल चर्चा करू शकत नाही. मातृत्व, इतरांची शुश्रूषा किंवा आयुष्यातील इतर बदलांमुळे घेतलेला करिअरमधील ब्रेक हा पुन्हा कामावर परतण्यासाठीचा अडथळा ठरू नये. रिटर्नशिप कार्यक्रमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नव्याने कसा विकसित करता येईल, यावर आम्ही विचार करत आहोत. उदाहरणार्थ, अशोका युनिव्हर्सिटीसारख्या शैक्षणिक संस्थांशी भागीदारी करणे किंवा महिलांना आत्मविश्वासाने कामावर परतता येईल असे मार्ग निर्माण करण्याबाबत चर्चा करणे, यातून आम्ही हे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. इंडिया इंक्लूडेड ऑन कॅम्पस हा तरुणांना या चर्चेत सहभागी करून घेण्याचा, त्यांना या आव्हानावर काम करण्याची संधी देण्याचा आणि अधिक सर्वसमावेशक कार्यस्थळे घडवण्यासाठी नवीन दृष्टिकोन समोर आणण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
2025 मध्ये सुरू झालेल्या इंडिया इंक्लूडेड ऑन कॅम्पस या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात आयआयएम त्रिची, आयआयएम लखनौ, आयआयएम मुंबई आणि एसआयबीएम पुणे येथील विद्यार्थ्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे योगदान आणि नोकरी सोडण्याचे प्रमाण (attrition) या विषयात काम केले. गोदरेज ॲग्रोव्हेट (Godrej Agrovet) मधील सर्वसमावेशकता आणि स्त्री - पुरुष समानता अधिक बळकट करण्याबाबतच्या संशोधनावर आधारित केस स्टडी सादर करणाऱ्या आयआयएम त्रिचीने विजेतेपद पटकावले. पहिल्या पर्वाच्या यशानंतर, दुसऱ्या पर्वात या उपक्रमाचा विस्तार व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत करण्यात आला असून, यात महिलांच्या करिअरमधील सातत्याचा नव्याने विचार कंपन्या कसा करू शकतात, यासंदर्भातील आव्हान देण्यात आले आहे.
विजेत्या संघाला 1,00,000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळेल, तर अंतिम फेरीतील स्पर्धकांना गोदरेजच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर