
रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । 'मिशन फिनिक्स' अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थ विक्रेते व नशेखोर यांच्या विरोधात धडक कारवाई केली .विशेष मोहिमेत 16 गुन्हे दाखल झाले असून 22 आरोपी अटक करण्यात आली. कारवाईत 2,02,200/- किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बाळगणे व सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या 'मिशन फिनिक्स' अंतर्गत दि. 08/09/2026 ते 14/09/2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाण्यांमार्फत अमली पदार्थांची विक्री करणारे, बेकायदेशीर ताबा तसेच सेवन करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेत अमली पदार्थ सेवनाचे एकूण 10 गुन्हे तसेच अमली पदार्थ बाळगल्याचे 6 गुन्हे, असे एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यांमध्ये एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 77,000/- किमतीचे 5.15 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन (Brown Heroin) तसेच 1,25,200/- किमतीचा 2.511 किलो ग्रॅम गांजा, असा एकूण 2,02,200/- किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी करणारे तसेच त्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असून, अमली पदार्थांच्या विळख्यातून युवक व समाजाला दूर ठेवण्यासाठी 'मिशन फिनिक्स' अंतर्गत प्रतिबंधात्मक व जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात येत आहे की, जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवन याबाबत कोणतीही माहिती नागरिकांना प्राप्त झाल्यास त्यांनी ती तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात येथे कळवावी अथवा रत्नागिरी पोलीस दलाच्या रत्नसेत चॅटबॉट-9371415612 द्वारे माहिती द्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी