
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
निलंगा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
निलंगा तालुक्यातील बुजरगवाडी शिवारातील शेतात अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गांजाची सात झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन ४६ किलो ८७५ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २३ लाख ४३ हजार ७५० रुपये आहे.
या प्रकरणी वाघंबर दिगंबर लिंबापूरे (वय ६०, रा. बुजरगवाडी, ता. निलंगा) याच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांना बुजरगवाडी येथील शेतात गांजाची अवैध झाडे लावल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार, शासकीय पंच आणि तांत्रिक पथकाने बुजरगवाडी शिवारातील गट क्रमांक १४ मधील जनार्दन दत्तात्रय भोईमार यांच्या मालकीच्या शेतात पाहणी केली.
यावेळी उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली आढळून आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सात गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त गांजाचे वजन ४६ किलो ८७५ ग्रॅम असून, प्रति किलो ५० हजार रुपये या प्रमाणे त्याची किंमत २३ लाख ४३ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतामध्ये गांजाची झाडे लागवड करून त्यांचा अवैध वापर अथवा विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केल्याचा प्राथमिक संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ यांच्याकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव व पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, सफौ. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे आदींचा सहभाग होता.
लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध लागवड, विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis