
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारणीत चाकूर तालुक्यातील विलासराव पाटील चाकूरकर यांची उपाध्यक्षपदी, तर अॅड. माधवराव कोळगावे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
चाकूरकर हे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असून सध्या चाकूर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आहेत. तर अॅड. कोळगावे यांनी पंचायत समिती सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आगामी काळातील संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसची नवी
कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रस्तावानुसार झालेल्या या नियुक्त्यांनंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि धीरज देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नव्या पदाधिकाऱ्यांनी जनहिताचे प्रश्न घेऊन पक्षसंघटना अधिक मजबूत करावी, असे आवाहन साळुंके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis