
चंद्रपूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
बांबू ही अतिशय जलद वाढणारी आणि बहुउपयोगी वनस्पती असून पर्यावरण रक्षण, कार्बन शोषण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने तिचे महत्त्व मोठे आहे. पारंपरिक वापरासोबतच बांधकाम, उद्योग आणि विविध मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये बांबूचा वापर वाढत असल्याने भविष्यात बांबू आधारित उद्योगांना मोठा वाव आहे, असे प्रतिपादन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे संचालक आर. एम. रामानुजम यांनी केले.
‘Bamboo for the Future – From Tradition to Innovation’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक बांबू सप्ताह–2026’ अंतर्गत चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे बांबू प्रदर्शन तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. रामानुजम यांच्या हस्ते झाले.
पाच दिवसीय आयोजित जागतिक बांबू सप्ताहाचा उद्देश बांबूला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास, मूल्यवर्धन आणि नवोपक्रमाशी जोडणे हा आहे. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना रामानुजम म्हणाले की, भारतात बांबूच्या विविध प्रजाती आढळतात. बांबू जलद वाढणारा असून वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची त्याची क्षमता पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीनेही बांबूच्या वापराला मोठी क्षमता असून कोळशाच्या तुलनेत बांबूचे उष्मांक मूल्य अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोळशापासून सुमारे 2,500 किलोकॅलरी उष्मांक मूल्य, तर बांबूपासून सुमारे 3,500 ते 4,000 किलोकॅलरी उष्मांक मूल्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. राखेतील घटकांच्या प्रमाणाबाबतही बांबू तुलनेने उपयुक्त ठरत असल्याचे सांगत पर्यावरणपूरक पर्याय म्हणून बांबूच्या वापराला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पारंपरिक वापरापासून आधुनिक बांधकामापर्यंत..
बांबूचा वापर आता केवळ टोपल्या, हस्तकला किंवा पारंपरिक वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांबूचा उपयोग विविध संरचना, घरे, पूल तसेच इंटेरियर डिझाइनसाठी केला जात आहे. देश-विदेशातील विमानतळ व आधुनिक वास्तूंमध्येही बांबूचा वापर होत असल्याची विविध उदाहरणे श्री. रामानुजम यांनी यावेळी दिली. बांबूवर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करून रोजगार व उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीचे संचालक तथा अपर संचालक (प्रशिक्षण), चंद्रपूर वन प्रबोधिनी यांनी प्रास्ताविकातून जागतिक बांबू सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व रुजविण्यासाठी विविध स्पर्धा तसेच बांबू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग..
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील 16 शाळा व महाविद्यालयांतील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसाठी बांबू विषयावर प्रश्नमंजुषा, क्रॉसवर्ड चॅलेंज, स्केच व पेंटिंग, निबंध, घोषवाक्य आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित बांबू प्रदर्शनातून बांबूचे विविध उपयोग, त्यापासून तयार होणारी उत्पादने तसेच बांबू क्षेत्रातील नवकल्पनांची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव