
लातूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळशी फाटा येथे कारवाई करून ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली दोन धारदार हत्यारे आणि टोयटो फॉरच्यूनर वाहन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४४७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित तीन आरोपी पळशी फाटा येथे फॉर्च्यूनर वाहनासह थांबलेले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पथकाने पळशी फाटा येथे कारवाई केली.
यावेळी पांढऱ्या रंगाच्या टोयटो फॉर्च्यूनर क्रमांक एमएच ४४ टी ०२२१ या वाहनात तीन व्यक्ती आढळून आल्या. चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे अल्ताफखान सरदारखान पठाण (वय ४१, रा. मिलिंद नगर, परळी वैजनाथ, जि. बीड), उमर मेहबुब शेख (वय २४, रा. आझाद नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) आणि खालेद हमीद शेख (वय ३९, रा. मिलिंग नगर, हामु. बरकत नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) अशी आहेत.
फॉर्च्यूनर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये कोयत्यासदृश धारदार हत्यार आणि फोल्डिंग चाकू आढळून आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही हत्यारे तसेच फॉर्च्यूनर वाहन जप्त करण्यात आले.
तिन्ही आरोपींना पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिल्लापटे आदींच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis