
त्रंबकेश्वर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर जव्हार मार्गावरतीअंबई डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेल्या पथकाला अडवून मारहाण करत पैशांची लूटमार केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्रंबकेश्वर पोलिसांनी जाऊन तीन जणांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून दरम्यान राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीही पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणी कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. तर या सर्व प्रकरणामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आलेला आहे
महिनाभरापूर्वी त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून स्थानिकांनी पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करत त्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावात कुटुंबासह ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपला काही तरुणांनी दादागिरी करत मारहाण आणि पैसे वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सुट्टीनिमित्त नाशिकमधील ट्रेकर्सचा एक ग्रुप वाहनातून अंबई डोंगरावर फिरण्यासाठी निघाला होता.यावेळी अंबई गावात नाशिकच्या ट्रेकर्स ग्रुपचे वाहन आल्यावर काही जणांनी त्यांचे वाहन अडवून पैशांची मागणी केली. तुमच्या गाडीने आमच्या गाडीला कट मारल्याने गाडीचे नुकसान झाल्याचे कारण सांगत टोळक्याने वाद घालण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने ट्रेकर्सच्या वाहनांमधील सर्वच हादरले. यानंतर काही जणांनी उतरुन दुसऱ्या गाडीचे खरोखर नुकसान झाले आहे का? याची पाहणी केली असता कुठेही नुकसान झाल्याचे दिसले नाही. ट्रेकर्स ग्रुपने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर टोळक्याने आपल्या इतर साथीदारांना फोन करुन बोलावून घेतले. त्यांचे साथीदार आल्यानंतर त्यांनी ट्रेकर्स यांच्या वाहन चालकाला मारहाण करुन वाहनाबाहेर ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ट्रेकर्स ग्रुपने त्यांना खडसावल्यावर ते सर्वजण पळून गेले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ट्रेकर्सच्या ग्रुपने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI