कौशल्याच्या बळावर युवकांनी स्वावलंबी व्हावे : संजय गुरव
छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : बदलत्या काळात केवळ शिक्षण पुरेसे नसून त्याला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून, स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येक युवकाकडे रोजगाराभिमुख कौशल्य असणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रांत
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 सप्टेंबर (हिं.स.) : बदलत्या काळात केवळ शिक्षण पुरेसे नसून त्याला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून, स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येक युवकाकडे रोजगाराभिमुख कौशल्य असणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची कमतरता असून, ही गरज पूर्ण करण्यासाठी शासनाकडून युवकांच्या कौशल्य विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती घेऊन युवकांनी कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी केले.

लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील नवतरुण गणेश मंडळाच्या गणरायाच्या स्थापना स्थळी आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या लोकसंवाद कार्यक्रमातून संजय गुरव यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन विभागाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती ग्रामस्थांना दिली. तर अमोल कोवे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकांच्या कल्याण, संरक्षण आणि पुनर्वसनविषयक योजनांची माहिती दिली.

गणेशोत्सवानिमित्त एकत्र आलेल्या ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातच संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट मिळाल्याने हा ‘लोकसंवाद’ कार्यक्रम केवळ माहिती देणारा न ठरता शासकीय योजना आणि पात्र लाभार्थी यांच्यातील थेट दुवा ठरला.

यावेळी गुरव यांनी सांगितले की, युवकांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि पंडित दीनदयाळ कौशल्य विकास योजना यांसह विविध कौशल्यविषयक योजना राबविण्यात येत आहेत. युवकांना त्यांच्या आवडीनुसार तसेच रोजगाराच्या गरजेनुसार विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता असलेल्या युवकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती ‘महास्वयम्’ पोर्टलवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande