
अबुधाबी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे धाकटे भाऊ शेख अहमद बिन राशिद अल मकतूम यांचे निधन झाले. सोमवारी शेख मोहम्मद यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. त्यांच्या निधनानंतर दुबईमध्ये १० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही.
संयुक्त अरब अमिरातीच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, ‘ईश्वराच्या इच्छेवर आणि नियतीवर अढळ विश्वास ठेवत, संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच दुबईचे शासक, महामहिम शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या कार्यालयाकडून शेख अहमद बिन राशिद अल मकतूम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. ईश्वराच्या इच्छेनुसार, ते आज सोमवारी सकाळी आपल्या प्रभूच्या चरणी विलीन झाले.’
निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, पुढील १० दिवस अधिकृत शोक पाळण्यात येणार असून, यानिमित्त दुबईतील सर्व ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील.आपल्या भावाला वैयक्तिक श्रद्धांजली अर्पण करताना, संयुक्त अरब अमिरातीच्या पंतप्रधानांनी शेख अहमद बिन राशिद अल मकतूम यांना ‘जन्नतमध्ये स्थान मिळावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना धैर्य व शांती मिळावी’, अशी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode