
-कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याहस्ते उद्घाटन
अमरावती, 21 सप्टेंबर (हिं.स.) । संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आगामी 2027 मध्ये होणा-या सर्व प्राधिकारिणींच्या निवडणुका शांततेत आणि योग्यरित्या पार पडाव्या, यासाठी विद्यापीठात स्वतंत्र निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी फित कापून रितसर उद्घाटन केले.
विद्यापीठ अंतर्गत विविध प्राधिकारिणींच्या निवडणुका घेतल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची नितांत आवश्यकता लक्षात घेता, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहालगतच्या हॉलमध्ये स्वतंत्र निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे कुलगुरूंनी सोमवारी फित कापून उद्घाटन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सर्व निवडणुका योग्य, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली असून, सर्व संबंधित घटकांनी या निवडणुकीत सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. असनारे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी