
वर्धा 21 सप्टेंबर (हिं.स.) खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा फटका कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन व कापूस पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत सलग २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला असून, आणखी सहा महसूल मंडळांत १८ ते २० दिवसांचा खंड नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे संवेदनशील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आर्वी, विरूळ, देवळी, पुलगाव, सेलू, झडशी, हिंगणघाट, वाघोली व तळेगाव (टा.) या महसूल मंडळांत सलग २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला. याशिवाय आष्टी, आंजी, कन्नमवार ग्राम, ठाणेगाव, खरांगणा व रोहणा या सहा महसूल मंडळांत १८ ते २० दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली, कुटकी, वडनेर, वाघोली व हिंगणघाट या पाच महसूल मंडळांत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र ४ लाख ६ हजार ५५५ हेक्टर असून यंदा प्रत्यक्ष ४ लाख १९ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या १०३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार ६५५ हेक्टर असून १ लाख १९ हजार ७३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
कापसाची वाढही खुंटली
जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र २ लाख १८ हजार ६११ हेक्टर असून यंदा २ लाख ३२ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हे क्षेत्र सरासरीच्या १०६ टक्के आहे. कापसाची उंची साधारण २ ते ३.५ फूट असून काही ठिकाणी शाखीय वाढ, तर काही भागांत पाते, फुलोरा तसेच बोंडधारणा व बोंड भरण्याची अवस्था आहे. कापसावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव सध्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीतील कापसाची पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. पावसाचा खंड आणि कमी पावसाचा परिणाम झाल्याने महसूल मंडळनिहाय सरासरी उत्पादनात १० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. प्रतिहेक्टरी १.५ ते ४ क्विंटलपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
-----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी