अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी 25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल होणार
नवी दिल्ली,21 सप्टेंबर (हिं.स.) : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशी जवळपास पूर्ण झाली असून, 25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येई
राम मंदिर


नवी दिल्ली,21 सप्टेंबर (हिं.स.) : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशी जवळपास पूर्ण झाली असून, 25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देशाचे सरन्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही माहिती दिली. पहिल्या अटकेपासून 90 दिवसांची मुदत 25 सप्टेंबर रोजी पूर्ण होत असल्याचे मेहता यांनी सांगितले. त्यापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विशेष तपास पथकाने तपासासंदर्भातील स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला असून, खंडपीठानेही या अहवालाची पाहणी केली.सरन्यायमूर्तींनी निर्देश देताना सांगितले की, एसआयटीला आरोपपत्र दाखल करायचे असल्यास ते दाखल करावे आणि त्यानंतर संबंधित न्यायालयाने कायद्यानुसार पुढील कार्यवाही करावी. तसेच, प्रकरणातील लागू कलमे लक्षात घेता या प्रकरणाची सुनावणी दंडाधिकारी न्यायालयाऐवजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सीसीटीव्हीमध्ये आढळली 105 वेळा चोरीची घटना

एसआयटीच्या तपासात राम मंदिरातील देणगी चोरीच्या घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये 105 वेळा आढळून आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली. तपासादरम्यान किती जणांना अटक करण्यात आली असून, चोरीप्रकरणी कोणते पुरावे मिळाले आहेत, याची माहितीही न्यायालयासमोर मांडण्यात आली.सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात आल्याचे SIT च्या स्थिती अहवालात नमूद करण्यात आले आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध सामग्रीचे विश्लेषण कशा पद्धतीने करण्यात आले, याची माहितीही अहवालात देण्यात आली आहे.सर्व संबंधित माहिती आणि एसआयटीचा स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नोंदीत घेतला आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande