इटलीच्या शाळांमध्ये बुर्का-नकाबवर बंदी; मेलोनी सरकारचा मोठा निर्णय
रोम, 21 सप्टेंबर (हिं.स.)।इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक मोठा धोरणात्मक बदल प्रस्तावित केला आहे. त्यांच्या सरकारकडून लवकरच एक उपाययोजना सादर केली जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली. या उपाययोजनेअंतर्गत इटलीतील शाळांमध्ये बुर्का आणि नकाब
इटलीच्या शाळांमध्ये बुर्का-नकाबवर बंदी; मेलोनी सरकारचा मोठा निर्णय


रोम, 21 सप्टेंबर (हिं.स.)।इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक मोठा धोरणात्मक बदल प्रस्तावित केला आहे. त्यांच्या सरकारकडून लवकरच एक उपाययोजना सादर केली जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली. या उपाययोजनेअंतर्गत इटलीतील शाळांमध्ये बुर्का आणि नकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, वर्गांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित केली जाणार आहे. स्थलांतर आणि सांस्कृतिक एकात्मतेच्या मुद्द्यावर मेलोनी सरकारचा कठोर दृष्टिकोन या निर्णयातून दिसून येतो.

मेलोनी यांनी त्यांच्या राष्ट्रवादी-पुराणमतवादी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या युवा शाखेला संबोधित केले. प्रस्तावित उपाययोजनेत आणखी एका महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, ज्या परदेशी विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘शाळा व्यवस्थेत एकरूप होण्यात गंभीर अडचणी’ येत आहेत, अशा पालकांसाठी इटालियन भाषेचे वर्ग अनिवार्य केले जाणार आहेत.

रोममध्ये आयोजित ‘जियोव्हेंटू नाझियोनाले’ या राष्ट्रीय महोत्सवात टाळ्यांच्या कडकडाटात बोलताना मेलोनी म्हणाल्या, “आमच्यासाठी, जो कोणी इटलीत येतो आणि येथे आपले भविष्य घडवू इच्छितो, त्याने आमची भाषा शिकली पाहिजे.”त्या पुढे म्हणाल्या, “त्यांनी आमची संस्कृती समजून घेतली पाहिजे आणि आमच्या नियमांचा आदर केला पाहिजे.” मेलोनी यांनी यावर भर दिला की, “त्यांचे स्वागत करण्याचा हा एकमेव गंभीर मार्ग आहे.”

मेलोनी यांनी विशेषतः बुर्कावरील बंदीचा उल्लेख केला. बुर्का हा काही मुस्लिम महिला परिधान करीत असलेला असा पोशाख आहे, ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. त्यांनी नकाबवरही बंदी घालण्याची घोषणा केली. नकाब हा काही अतिशय पुराणमतवादी मुस्लिम महिला परिधान करतात; त्यामध्ये केवळ डोळे दिसतात.मात्र, रविवारी (२० सप्टेंबर) केलेल्या आपल्या भाषणात मेलोनी यांनी हिजाबचा उल्लेख केला नाही. हिजाब हा काही मुस्लिम महिला डोक्यावर परिधान करीत असलेला स्कार्फ आहे.सरकारने ही उपाययोजना मंजूर केल्यानंतर ती कायदा बनण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असेल. ही मंजुरी ६० दिवसांच्या आत मिळवणे अनिवार्य असेल.

मेलोनी यांच्या राजकीय विचारांची मुळे कट्टर उजव्या विचारसरणीत खोलवर रुजलेली आहेत. स्थलांतराच्या मुद्द्यावर त्या सातत्याने कठोर भूमिका घेत आल्या आहेत. पंतप्रधान म्हणून कार्यकाळात त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याचे दिसून आले आहे. एकेकाळी राष्ट्रवादी राजकारणातील बाहेरची व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलोनी आता युरोपियन युनियनमधील राजकारण्यांमध्ये एक प्रस्थापित आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून समोर आल्या आहेत.त्यांच्या धोरणांमध्ये अनेकदा इटलीची राष्ट्रीय ओळख आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले जाते. हा त्यांच्या राजकीय अजेंड्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मेलोनी आपली लोकप्रियता आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उद्देशाने त्या अनेक नवीन धोरणांची घोषणा करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला मेलोनी यांच्या पुराणमतवादी सरकारने दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये सलग सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे सरकार होण्याचा विक्रम केला. ही बाब त्यांच्या सरकारची राजकीय स्थिरता आणि देशातील वाढता प्रभाव दर्शवते. मतदारांना आकर्षित करणे आणि आपल्या सरकारची प्रतिमा अधिक मजबूत करणे, या उद्देशाने ही पावले उचलली जात असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande