
मुंबई, २१ सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभा राहतो तो ढोल-ताशांचा गजर, झगमगणारी रोषणाई आणि मोदकांचा घमघमाट. परंतु अजय अडसूळ यांच्यासाठी हा उत्सव केवळ एक सण नसून, त्यांच्यातील कलागुणांना आणि संवेदनशीलतेला खतपाणी घालणारी पहिली शाळा ठरली आहे. लहानाचे मोठे होताना धारावीसारख्या गजबजलेल्या भागात त्यांनी अनुभवलेला गणेशोत्सव आणि आजच्या आधुनिक युगात उत्सवात झालेला बदल यावर अजय अडसूळ यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...
धारावीतील बालपण आणि बाप्पाची ओढ
अजय अडसूळ यांच्या बालपणी धारावीच्या चिंचोळ्या गल्लीबोळांत गणपती आगमनाची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू व्हायची. त्याकाळी साधनांची कमतरता असली तरी लोकांची कल्पकता अफाट होती. पतंगाचे कागद, थर्माकोल, कागदी पुठे आणि साध्या दिव्यांच्या माळा वापरून देखावे सजवले जायचे.
मंडपातील रोषणाई करणे, मूर्ती आणण्यापासून ते देखावे बनवण्यापर्यंत प्रत्येक कामात गल्लीतील लहान-मोठ्यांसोबत अजय अडसूळ हिरीरीने सहभागी व्हायचे. बालपणीच्या याच साध्या पण कौशल्याने भरलेल्या कामांमधून कलेचे प्राथमिक धडे मिळाले, असे ते आवर्जून सांगतात.
उत्सवाकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन
अजय अडसूळ यांच्या नजरेतून गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो लोककलेचा महाकुंभ आहे. गल्लीतील सजावट, मूर्तिकारांच्या हाताची जादू, भजन-कीर्तन आणि रात्री रंगणाऱ्या नाटिका यांमुळेच त्यांची सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टी घडण्यास मोठी मदत झाली. धारावीतील विविधतेने नटलेल्या संस्कृतीत गणपती उत्सव हा सर्व घटकांना एकत्र आणणारा मुख्य दुवा राहिला आहे, असे मत त्यांनी मांडले.
'तेव्हा आणि आता': काळात झालेला बदल
काळाच्या ओघात उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांवर बोलताना अजय अडसूळ म्हणाले की, पूर्वी जिथे लोक स्वतः एकत्र येऊन महिना-दोन महिने आधीपासून देखावे तयार करायचे, तिथे आज इव्हेंट मॅनेजमेंट आणि रेडीमेड साहित्याचा वापर वाढला आहे. हस्तकलेची जागा आता ३D लाईट्स आणि डिजिटल स्क्रीनने घेतली आहे. प्रत्यक्ष संवादाऐवजी सोशल मीडिया आणि रील्सद्वारे आनंद साजरा करण्यावर भर दिला जात आहे. तरीही, आधुनिकतेच्या या युगात शाडूच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावटीबद्दल तरुणांमध्ये वाढलेली जागरूकता ही खूप सकारात्मक बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप हायटेक झाले; तरीही बाप्पाबद्दलची भक्ती आणि निष्ठा तीच आहे. धारावीच्या गल्लीबोळांत लहानपणी अनुभवलेला तो साधेपणा, आपुलकी आणि एकतेची शिकवण आजही अजय अडसूळ यांच्या मनात तितकीच ताजी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी