जयराम रमेश यांची महागाईवरून सरकारवर टीका
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी देशात खाद्यपदार्थ आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असतानाही मोदी सरकार महागाईच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप केला. डाळी, मसाले, खाद्यतेल आणि कांद्या
Jairam Ramesh


नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी देशात खाद्यपदार्थ आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असतानाही मोदी सरकार महागाईच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप केला. डाळी, मसाले, खाद्यतेल आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या अडचणी वाढल्या आहेत. महागाईवर तातडीने कठोर पावले उचलून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी रमेश यांनी सरकारकडे केली.

रमेश यांनी सोमवारी ‘एक्स’वर गेल्या एका महिन्यात मसाल्यांच्या किमतींमध्ये १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, छोटी वेलची ४ हजार रुपयांवरून ४ हजार ४०० रुपये, मोठी वेलची २ हजार ४०० रुपयांवरून २ हजार ८०० रुपये, जिरे ३६० रुपयांवरून ४०० रुपये आणि जायफळ-जावित्री २ हजार ५०० रुपयांवरून ३ हजार रुपये प्रति किलो झाले आहे.

त्यांनी सांगितले की, तूर डाळ १०० रुपयांवरून १३० रुपये, चणा डाळ ७० रुपयांवरून १०० रुपये आणि उडीद डाळ १२० रुपयांवरून १४० रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचप्रमाणे मोहरीचे तेल १९० रुपयांवरून २१० रुपये आणि सफोला तेल २४० रुपयांवरून २८० रुपये प्रति लिटर झाल्याचा दावा त्यांनी केला.

रमेश यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबरदरम्यान कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत २९.५० रुपये प्रति किलोवरून वाढून ५३.७८ रुपये प्रति किलो झाली आहे. ही सुमारे ८२.३ टक्क्यांची वाढ असल्याचे सांगत त्यांनी महागाईमुळे गरीब कुटुंबांच्या घरातील डाळ आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थ आवाक्याबाहेर जात असल्याचा आरोप केला. सरकारने नियंत्रणाबाहेर गेलेल्या महागाईवर तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande