
रस्त्याला पडल्या भेगा, तांत्रिक तपासणीची मागणी
वर्धा, 21 सप्टेंबर (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३५३ आय गेल्या सात वर्षांपासून बांधकामाच्या प्रक्रियेत आहे. रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच तयार झालेल्या काही भागांवर ठिकठिकाणी भेगा पडून रस्ता उखडू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, संबंधित विभागाने कामाची तांत्रिक तपासणी करून गुणवत्तेची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.
सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ड्रायपोर्टला जोडणाऱ्या ३५३ आय मार्गाची नव्याने निर्मिती करण्यात आली असून, या मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांना सुरक्षित आणि दर्जेदार मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच तयार झालेल्या काही भागांवर आतापासूनच भेगा पडल्याचे निदर्शनास येत असल्याने बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, कामाची पद्धत आणि आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्याची अशी अवस्था होत असल्याने भविष्यात या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक रस्ता कितपत सहन करू शकेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित यंत्रणेकडून नियमित देखरेख आणि गुणवत्तेची तपासणी केली जाते. असे असतानाही नव्या रस्त्यावर भेगा पडत असल्यास या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भेगा पडण्यामागील नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी रस्त्याची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कामात दोष अथवा निकृष्टता आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी. तसेच रस्त्याची गुणवत्ता निश्चित केल्यानंतरच काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी