अमरावतीत पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी
अमरावती, 21 सप्टेंबर (हिं.स.) । महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विविध शास
अमरावतीत पालकमंत्री बावनकुळे यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी


अमरावती, 21 सप्टेंबर (हिं.स.) । महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विविध शासकीय, प्रशासकीय तसेच स्थानिक प्रश्न घेऊन जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने नियोजन भवनात दाखल झाले.

जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. विविध विभागांशी संबंधित प्रश्न, प्रलंबित कामे, शासकीय योजनांचा लाभ, महसूलविषयक अडचणी, रस्ते, पाणी, वीज, जमीन तसेच अन्य स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी नागरिकांची नियोजन भवन परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांकडून आपल्या मागण्यांची निवेदने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आली.

प्रत्येक निवेदनाची माहिती जाणून घेत संबंधित विषय कोणत्या विभागाशी निगडित आहे, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जनता दरबारात विविध भागांतून आलेल्या नागरिकांमुळे नियोजन भवन परिसरात दिवसभर वर्दळ पाहायला मिळाली. आपल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून तत्काळ दखल घेण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान, जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपले प्रश्न थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती नोंदविली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडेही आपल्या प्रश्नांची माहिती दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांच्या निवेदनांची दखल घेत संबंधित यंत्रणेला कार्यवाहीच्या सूचना दिल्याने आता या प्रश्नांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande