परभणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून केवळ ‘एफएफएस’ अँपद्वारे खत विक्री
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकरी आता घरबसल्या करू शकणार क्यूआर कोडद्वारे खताचे बुकिंगकेंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने करता यावी, यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही मोबाईल आधारित
परभणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून केवळ ‘एफएफएस’ अँपद्वारे खत विक्री


परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकरी आता घरबसल्या करू शकणार क्यूआर कोडद्वारे खताचे बुकिंगकेंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने करता यावी, यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित केली आहे. परभणी जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०२६ पासून खत विक्रीची अंमलबजावणी केवळ मोबाईल अँपव्दारे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८५० खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून, सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवून पूर्व-बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकाच्या आधारे खताची शिफारस केलेली मात्रा अँपमध्ये उपलब्ध होईल. त्यानुसार आवश्यक खत आणि जवळचा अधिकृत विक्रेता निवडल्यानंतर अर्ज सादर करता येईल. बुकिंग यशस्वी झाल्यानंतर मोबाईलवर युनिक क्यूआर कोड व टोकन क्रमांक प्राप्त होईल.

तीन दिवसांत क्यूआर कोड दाखवून खत खरेदी

शेतकऱ्याने अधिकृत खत विक्रेत्याकडे मोबाईलवरील QR कोड दाखविल्यानंतर e-POS मशीनद्वारे पावतीसह खत प्राप्त करता येईल. प्राप्त QR कोडच्या आधारे तीन दिवसांच्या आत खत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खत दुकानांवरील गर्दी व लांबच लांब रांगा कमी होण्यास मदत होईल.

एफएफएस अँपमुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पूर्व-नोंदणी व बुकिंगमुळे खत दुकानांवरील गर्दी कमी होईल. कृत्रिम तुटवड्याला आळा बसणार असून, युरिया, डीएपी यांसारख्या आवश्यक खतांचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा रोखण्यास मदत होईल. जमिनीचे क्षेत्रफळ व पिकाच्या गरजेनुसार खताच्या शिफारस केलेल्या मात्रेची माहिती मिळेल. तसेच शेतकऱ्यांना मोबाईलवरून घरबसल्या खताचे बुकिंग करता येईल. या अँपमुळे बुकिंग, विक्रेता आणि खत वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.

‘Google Play Store’वरून FFS अँप डाउनलोड करा

‘Framework for Fertilizer Sale (Ministry of Agriculture)’ हे मोबाईल अँप Google Play Store वरून डाउनलोड करून शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करावी. त्यानंतर पिकाची माहिती व आवश्यक खतांची मागणी नोंदवून पूर्व-बुकिंग करता येईल.

खत खरेदीची टप्पानिहाय प्रक्रिया

टप्पा १ – अँप डाउनलोड : स्मार्टफोनमध्ये FFS मोबाईल अँप डाउनलोड करून नोंदणी करावी.

टप्पा २ – पूर्व-नोंदणी व बुकिंग : पिकाची माहिती आणि आवश्यक खतांची मागणी नोंदवून पूर्व-बुकिंग पूर्ण करावे.

टप्पा ३ – QR कोड प्राप्त करा : बुकिंग यशस्वी झाल्यानंतर प्राप्त झालेला QR कोड व टोकन क्रमांक मोबाईलमध्ये जतन करावा.

टप्पा ४ – खत खरेदी : अधिकृत खत विक्रेत्याकडे QR कोड दाखवून e-POS मशीनद्वारे पावतीसह खत प्राप्त करावे.

खत विक्रेत्यांसाठीही आवश्यक पूर्वतयारी

जिल्ह्यातील सर्व वैध खत विक्रेत्यांनी आपले परवाने iFMS पोर्टलवर अद्ययावत व नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच दुकानातील L1 e-POS मशीन कार्यरत असल्याची खात्री करावी. प्रत्यक्ष उपलब्ध खत साठा आणि POS प्रणालीवरील साठा यामध्ये तफावत राहणार नाही, याची दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी.

अडचणींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर हेल्पडेस्क

शेतकरी व खत विक्रेत्यांना FFS प्रणालीच्या वापरादरम्यान येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर हेल्पडेस्क स्थापन करण्यात येत असून, त्यांचे संपर्क क्रमांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तसेच खत विक्रेत्यांनी २५ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणाऱ्या या प्रणालीचा अवलंब करून या पारदर्शक व सुलभ प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande