
जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) घरगुती गणपती विसर्जनासाठी रिक्षातून जात असताना रावेर शहरातील एका ठिकाणी काही व्यक्तींनी संबंधितांना “इथून जाऊ नका” असे सांगितल्याची घटना घडली. यावेळी काही सेकंद किरकोळ दगडफेक झाली. मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच रिक्षाचेही कोणतेही नुकसान झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित घरगुती गणपतीचे विसर्जन देखील शांततेत पूर्ण झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः रावेर पोलीस ठाण्यात उपस्थित असून, पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली जात आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या रावेर शहरात पूर्णपणे शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. घटनास्थळी किंवा परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झालेली नाही. पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.नागरिकांनी या घटनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच ती सोशल मीडियावर पुढे प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर