
खार्टूम, 21 सप्टेंबर (हिं.स.)।सुदानच्या ईशान्य भागात सोन्याची एक खाण कोसळली. या दुर्घटनेत किमान ११ खाण कामगारांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.
सरकारी कंपनी ‘सुदानी मिनरल रिसोर्सेस कंपनी’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “रविवारपर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ३० जणांना वाचवण्यात आले आहे.” नाव न सांगण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. त्यांना माध्यमांशी बोलण्याची परवानगी नव्हती. खाण कोसळून झालेल्या मृत्यूबद्दल कंपनीने एका निवेदनाद्वारे दुःख व्यक्त केले; मात्र, मृत आणि जखमींच्या संख्येबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
एका आठवड्यात सुदानमध्ये अनधिकृत सोन्याची खाण कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या रविवारी देशाच्या पश्चिम भागातील सोन्याच्या आणखी एका खाणीतील अनेक बोगदे कोसळल्याने किमान ८२ जणांचा मृत्यू झाला होता.हा परिसर निमलष्करी ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’च्या (आरएसएफ) नियंत्रणाखाली आहे. आरएसएफ गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुदानी लष्कराशी संघर्ष करत आहे. या परिसरात काम करणारे अब्दालहाय खारीफ अबाकर यांनी सांगितले की, ईशान्येकडील रेड सी राज्यातील दुर्गम ओनी भागात शनिवारी रात्री ही खाण दुर्घटना घडली.
सोन्याचे उत्पादन करणाऱ्या सुदानमध्ये खाणी कोसळून होणाऱ्या मृत्यूमागे सुरक्षा मानकांचे मोठ्या प्रमाणावर पालन न होणे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
एप्रिल २०२३ मध्ये सुदानमध्ये आरएसएफ आणि सुदानी लष्करादरम्यान संघर्ष सुरू झाल्यानंतर देशात पूर्ण युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा’ या संघर्षावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत किमान ५९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.मदतकार्य करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे की, ही संख्या प्रत्यक्ष मृतांची संख्या कमी दाखवणारी आहे आणि वास्तविक मृतांचा आकडा यापेक्षा अनेक पटींनी अधिक असू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode