
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने एमआयडीसी परिसरातील गुरु रविदास महाराज भवन तथा प्रबोधन केंद्र येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात चर्मकार समाज मेळावा, भव्य आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अंगणवाडी सेविकांचा सन्मान तसेच संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे होते.प्रमुख मार्गदर्शक अमोल वाघमारे यांनी गुरु रविदास महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन करताना सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले. भालचंद्र गोरे यांनी युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे सांगितले.
यावेळी अंगणवाडी सेविकांना साडी वाटप करून सन्मानित करण्यात आले. आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषध वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिरालाही युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. भगवान अस्वारकर, डॉ. मनोज पोरवाल, डॉ. मंजुषा नरवाडकर आदींचे सहकार्य लाभले. शिवाजीराव भरोसे यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रभावतीताई अन्नपूरे, मोतीराम कांबळे, भगवानराव असेवार, प्रा. रमा शेजावळे, मनीषा जाधव, उमेश शेळके, अपर्णा जोशी, दिपाली वाघ, अंकुश जोगदंड यांच्यासह समाजबांधव, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन एम. जी. शेवाळे यांनी केले, तर दीपक कटारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis