
विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांकडून सूचना व मते जाणून घेण्यास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेल्या भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाला छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झाली.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक सुरू असून, या बैठकीत विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मते जाणून घेतली जात आहेत. भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी त्यांच्या अनुभवांचा आणि सूचनांचा विचार करण्यात येत आहे.
बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी तसेच सदस्य तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित आहेत.
दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले आहेत.
यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच सह आयुक्त मंजूषा मिसकर उपस्थित होते.
समितीच्या चर्चेतून राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धती अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना व शिफारशी निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis