आधीचे विधान मागे घेत आयआयटी मुंबईकडून दिलगिरी
प्रा. सूर्यनारायण डूला यांचे डीनपद निलंबित मुंबई, 21 सप्टेंबर (हिं.स.) : आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या वादाला सोमवारी नवे वळण मिळाले. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआ
आयआयटी- मुंबई लोगो


प्रा. सूर्यनारायण डूला यांचे डीनपद निलंबित

मुंबई, 21 सप्टेंबर (हिं.स.) : आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या वादाला सोमवारी नवे वळण मिळाले. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने घटनेनंतर केलेल्या आधीच्या निवेदनाबद्दल दिलगिरी व्यक्त करत, साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवरील घटनांबाबत चौकशी पूर्ण होण्यापूर्वी ठाम निष्कर्ष मांडणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी प्रा. सूर्यनारायण डूला यांचे डीनपद तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. डूला यांच्यावरील पुढील कारवाई चौकशीच्या निष्कर्षांनंतर निश्चित केली जाईल. डूला यांचे डीनपद निलंबित करण्यात आले असले तरी ते प्राध्यापक म्हणून तसेच ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहेत. संस्थेने आधीच्या निवेदनात साहिल मध्य-सत्र परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना आढळल्याचा आणि प्रश्नपत्रिका चॅट-जीपीटीवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला होता. मात्र, या घटनेनंतर त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, त्याचे समुपदेशन करण्यात आले होते आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते, अशी भूमिका संस्थेने मांडली होती.

मात्र, साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या हाताळणीवर प्रश्न उपस्थित केले. साहिलवर मानसिक दबाव आणण्यात आल्याचा तसेच जातीय भेदभाव आणि छळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांवरून मुंबई पोलिसांनी प्रा. डूला यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. हे आरोप अद्याप तपासाधीन आहेत.या पार्श्वभूमीवर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले. रविवारी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी संस्थेसमोर 18 मागण्यांचे निवेदन ठेवले. त्यात प्रा. डूला यांच्यावरील कारवाईबरोबरच साहिलच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, प्रशासनाकडून खुली माफी, विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा, मानसिक आरोग्यविषयक उपाययोजना आणि अधिक पारदर्शक शिस्तभंग प्रक्रिया यांसारख्या मागण्यांचा समावेश होता. संचालक प्रा. केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी सुमारे 3 तास चर्चा केली आणि मागण्यांच्या सनदेला स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे

दरम्यान, आयआयटी मुंबईच्या फॅकल्टी फोरमने प्रा. डूला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. डूला हे संस्थेच्या सिनेटने मंजूर केलेल्या नियमांनुसार परीक्षेतील आपले कर्तव्य बजावत होते, असा फोरमचा दावा आहे. सोमवारी काही प्राध्यापकांनीही डूला यांच्या समर्थनार्थ कॅम्पसमध्ये भूमिका मांडली.या संपूर्ण प्रकरणात आता संस्थेची चौकशी आणि पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

आयआयटी बॉम्बेने आधीच्या निवेदनातील माहितीबाबत भूमिका बदलत चौकशी पूर्ण होईपर्यंत घटनाक्रमाबाबत निष्कर्ष काढणे टाळण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे साहिलच्या मृत्यूच्या आधी नेमके काय घडले, परीक्षा प्रकरणाची संस्थात्मक हाताळणी कशी झाली आणि करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य कितपत आहे, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आयआयटी बॉम्बेने संचालक शिरीष केदारे यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताचेही खंडन केले आहे. संस्थेने हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande