
जालना, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
जालना शहरात सिटी बससेवेचा दिमाखात शुभारंभ भाजपाचे नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शहरातील नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बससेवा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
जालना बसस्थानक येथे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे इंदेवाडी, रामनगर, नागेवाडी यांसह शहरातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना या सिटी बससेवेचा मोठा फायदा होणार आहे. शहरातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना नेते भास्कर आंबेकर, महानगर भाजपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच मंडळातील कर्मचारी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करणाऱ्या या सिटी बससेवेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis