
जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली चढ-उताराची स्थिती कायम असून, (दि २१ सप्टेंबर) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्ण बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम १ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ३ हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि बदलत्या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस दरात वाढ झाल्यानंतर आता नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजाराने घसरण नोंदवली आहे.जळगावच्या बाजारात शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम (विना जीएसटी) इतका होता. २१ सप्टेंबर रोजी त्यात १ हजार रुपयांची घट झाली असून सोन्याचा भाव आता १ लाख ५२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे चांदीच्या दरातही मोठी घट झाली. शनिवारी चांदीचा भाव २ लाख ४१ हजार रुपये प्रति किलो (विना जीएसटी) होता. त्यात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाल्याने चांदीचा दर २ लाख ३८ हजार रुपये प्रति किलो झाला. सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी काहीशी अनुकूल स्थिती निर्माण झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर पुढील दिवसांतील दर अवलंबून राहणार असल्याने सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर