
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील कापुस उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने 'कापुस उत्पादकता अभियान' (कपास क्रांती - MCP) राबविण्यात मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 'कॉटन श्रेडर' अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा नंदुरबार जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
भारतातील कापूस क्षेत्रातील अडचणी, घटती उत्पादकता व गुणवत्तेच्या समस्या दूर करण्यासाठी सन
2026 ते 2030-31 या पाच वर्षांच्या कालावधीकाठी केंद्र सरकारने हे अभियान मंजूर केले आहे. या
अभियानांतर्गत राज्यातील 19 जिल्ह्यांची निवड झाली असून, त्यात नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश आहे.
योजनेचे स्वरूप व अनुदान:
शेतीत यांत्रिकीकरणास चालना देण्यासाठी 'कॉटन श्रेडर' या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. कृषी
यांत्रिकीकरण उपअभियाना (SMAM) योजनेच्या धर्तीवर राबविल्या जाणाऱ्या या घटकासाठी वैयक्तिक
शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र
राहणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण 76 कॉटन श्रेडरचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी
खालीलप्रमाणे अनुदान मिळणार आहे.
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी: 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 75 हजार पर्यंत अनुदान.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 40 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 60 हजार पर्यंत अनुदान.
अर्ज करण्याचे आवाहन व पद्धत:
या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड 'महाडीबीटी' पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्यया
तत्त्वावर केली जाणार आहे. इच्छुक वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट व संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह
https://mahadbt2.maharashtra.gov.in/farmer वर जाऊन 'यांत्रिकीकरण' या Tab अंतर्गत
'Cotton Shredder' या घटकासाठी त्वरीत ऑनलाइन अर्ज करावा.
योजनेच्या सविस्तर माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी
अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर