
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ची वारी गणरायाच्या दारी पोहचविण्यात येत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमांतर्गत परभणी शहर तसेच पालम येथील विविध गणेश मंडळांच्या प्रांगणात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय मदत कक्ष, आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
यावेळी ओमसाई रिठे, साईओम चव्हाण, विशाल गावडे, भागवत घोरपडे, कैलास चामले, विश्वजीत बाजगीर, संपादक मंदार कुलकर्णी, संपादक पांडुरंग अंभोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यामध्ये परभणी शहरातील नवा मोंढा भागातील ओम साई मित्र मंडळाचा परभणीचा राजा, श्री राजे शिवछत्रपती मित्र मंडळ, पालम येथील रामराज्य मित्र मंडळ आणि, त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या प्रांगणातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर यांनी गंभीर आजार, शस्त्रक्रिया व उपचारांसाठी पात्र गरजू रुग्णांना उपलब्ध आर्थिक सहाय्य, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. सामान्यपणे घरातील एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती व्यक्ती भांबावून जाते. अशावेळी धैर्याने परिस्थितीचा सामना करताना सर्वप्रथम रुग्णालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मदत कक्षाशी संपर्क साधावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक बी. एन. स्वामी यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर तसेच विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती दिली.गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी उपलब्ध योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis