परभणी : पाथरी तालुक्यात साधेपणाने महालक्ष्मी उत्सवाची सांगता
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पावसाची प्रदीर्घ ओढ, शिवारातील करपलेली पिके आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आलेले संकट अशा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही पाथरी तालुक्यात गौरी-महालक्ष्मी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. आर्थिक परिस्थित
Q


परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पावसाची प्रदीर्घ ओढ, शिवारातील करपलेली पिके आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आलेले संकट अशा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही पाथरी तालुक्यात गौरी-महालक्ष्मी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत यंदा सणावरील खर्चाला काहीशी कात्री लावण्यात आली असली, तरी गौराईच्या स्वागताचा उत्साह आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा ग्रामीण भागात कायम राहिली.

गौराईचे आगमन होताच गावागावांतील घरांमध्ये महिलांची लगबग सुरू झाली. अंगण स्वच्छ करून रांगोळ्या काढणे, दाराला तोरण बांधणे, फुलांची आरास करणे आणि घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून गौराईची सजावट करण्यात आली. माहेरवाशीण म्हणून गौराईचे स्वागत करण्याची ग्रामीण भागातील परंपरा यंदाही उत्साहाने जपण्यात आली.

महालक्ष्मीचे पूजन, नैवेद्य आणि आरती करण्यात आली. घरच्या पद्धतीनुसार विविध भाज्या, गोडधोड पदार्थ आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सवाष्णींना बोलावून हळदी-कुंकू, ओटी भरणे तसेच नातेवाईक व शेजारी महिलांच्या भेटीगाठींमुळे घराघरांत उत्सवी वातावरण निर्माण झाले.

थाट कमी; भक्तिभाव कायम

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महागडी सजावट, नवीन साहित्य आणि अनावश्यक खर्च टाळून उपलब्ध वस्तूंचा वापर करण्यावर महिलांनी भर दिला. मागील वर्षीचे सजावटीचे साहित्य पुन्हा वापरून साधेपणाने गौराईची आरास करण्यात आली. सणाचा खर्च कमी झाला असला तरी पूजाविधी आणि श्रद्धेत मात्र कोणतीही कमतरता राहू देण्यात आली नाही.

बाजारपेठेत महिलांची लगबग

महालक्ष्मीच्या पूजनासाठी आवश्यक फुले, हार, पूजेचे साहित्य, फळे, भाज्या, साड्या आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पाथरी शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत महिलांची वर्दळ वाढली होती. मात्र यंदा दुष्काळाची झळ लक्षात घेऊन गरजेपुरतीच खरेदी करण्याकडे अनेक कुटुंबांचा कल राहिला.

शेतमातीशी जोडलेला नैवेद्य

ग्रामीण भागातील महालक्ष्मी उत्सवाला शेतमातीशी जोडलेले वेगळे महत्त्व आहे. शेतात किंवा परसबागेत उपलब्ध झालेल्या भाज्या, घरचे धान्य आणि स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पदार्थांपासून नैवेद्य तयार करण्याची परंपरा अनेक घरांत आजही कायम आहे. यंदा मात्र पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाची छाया सणावरही जाणवली.

दुष्काळाची झळ; श्रद्धेची ओल कायम

घरच्या कुलाचारानुसार गौराईला भावपूर्ण निरोप देत महालक्ष्मी उत्सवाची सांगता करण्यात आली. तीन दिवसांच्या या उत्सवात शिवारात पावसाची प्रतीक्षा कायम असतानाही घराघरांत मात्र गौराईच्या आगमनाने आनंदाचे वातावरण होते.

शिवार दुष्काळाने होरपळत असले, तरी गौराईच्या रूपाने समृद्धीची आस आणि श्रद्धा कायम राहिली. आर्थिक अडचणींच्या काळातही खर्चाला लगाम घालत परंपरेचा धागा जपणाऱ्या ग्रामीण महिलांनी साधेपणातही महालक्ष्मी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande