
अध्यक्षांच्या राजीनाम्यासह ७० हजार पदांची मेगाभरती तातडीने सुरू करण्याची मागणी
पुणे, २१ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, पेपरफुटी तसेच रखडलेल्या भरती प्रक्रियेवरून स्पर्धा परीक्षार्थींमध्ये असंतोष कायम आहे. एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह राज्य सरकारने जाहीर केलेली ७० हजार पदांची मेगाभरती तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी २६ सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेला गती देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाने औषध निरीक्षक गट-ब पदाची भरती प्रक्रिया रद्द केली होती.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात एमपीएससीशी संबंधित अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि भरती प्रक्रियेतील विलंब याबाबत स्पर्धा परीक्षार्थींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये MPSC परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, कथित पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी करणे तसेच रखडलेल्या भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे यांचा समावेश आहे. २६ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु