जळगावात मुगाने गाठला विक्रमी भाव
जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) । यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन घटल्याचा थेट परिणाम आता जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळत असून, आवक रोडावल्यामुळे मुगाच्या
जळगावात मुगाने गाठला विक्रमी भाव


जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) । यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन घटल्याचा थेट परिणाम आता जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळत असून, आवक रोडावल्यामुळे मुगाच्या दराने उच्चांक गाठला आहे. जळगावात मुगाला यंदा हमीभावापेक्षा तब्बल अडीच ते ३ हजार रुपयांहून अधिक दर मिळत असून, मुगाने १२ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव गाठला.

यंदाच्या हंगामात मुगासाठी शासनाचा हमीभाव ८,७८० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मात्र, बाजारात मुगाची आवक रोडावल्याने खुल्या बाजारात शेतकऱ्यांना याहून कितीतरी पटीने अधिक दर मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत मुगाला ११ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. त्यातच शुक्रवार, १८ तारखेला या दरांनी मोठी झेप घेत तब्बल १२,३०० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. यामुळे हमीभावापेक्षा तब्बल अडीच ते तीन हजार रुपयांहून अधिक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.एकीकडे मुगाला सोनेरी भाव मिळत असताना, दुसरीकडे उडदाचे दर मात्र काहीसे कमी-जास्त होताना दिसत आहेत. सध्या जळगाव बाजार समितीत उडदाला गुणवत्तेनुसार ७,८०० ते ८,४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी सध्या मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे मूग उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande