
अमरावती, 21 सप्टेंबर (हिं.स.)। 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या प्रचारादरम्यान दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्या दर्यापूर येथील न्यायालयात हजर राहिल्या.
खल्लार येथे निवडणूक प्रचारसभेदरम्यान गोंधळ झाला होता. यावेळी काही जणांकडून नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्यात आल्याचे वृत्त त्यावेळी समोर आले होते. घटनेनंतर राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला होता. याच प्रकरणातील पुढील कायदेशीर कार्यवाहीच्या अनुषंगाने नवनीत राणा दर्यापूर न्यायालयात उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांच्या वतीने अॅड. अंजिक्य धर्माधिकारी व अॅड. आदित्य धर्माधिकारी यांनी न्यायालयीन बाजू मांडली.
प्रकरणाची सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या वेळी नवनीत राणा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान लोकप्रतिनिधी किंवा कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयाकडूनच होणार आहे.
दरम्यान, न्यायालयातील पुढील कार्यवाहीकडे समर्थक तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावेळी विनोद गुहे, अविनाश काळे, अजय देशमुख, संजय भारसाकळे, अमोल कोरडे, किरण श्रीराव, अंकुश रहाटे, राहुल पाटील गावंडे, गोपाल यादव, श्रीकृष्ण अण्णा डोंगरे, समिक्षा साखरे, शैलेश मेटकर, भाजपचे मदन पाटील बायस्कार, नरेंद्र कुंदलवार, डॉ. अनिल बोंडे, मेघा भारती आदी उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी