
परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
गोवंशीय पशूंची कत्तलीसाठी बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी परभणी शहरासह जिंतूर तालुक्यात पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या. नवा मोंढा पोलिसांनी आयशर टेम्पोसह सहा गोवंशीय पशू असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर कौसडी येथे बोरी पोलिसांनी जिवंत गाय व साहित्य असा 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाविरुद्ध कारवाई केली.
नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितील डोंबे तसेच पोलीस अंमलदार मो. मोसीन, लोमटे आणि खुपसे यांचे पथक गस्तीवर असताना एमआयडीसी परिसरातून एका आयशर टेम्पोमधून गोवंशीय पशूंची दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसीजवळ सापळा रचून संशयित वाहन थांबविले. वाहनचालकाची चौकशी केली पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचे सहा गोवंशीय पशू आणि पाच लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिंतूर तालुक्यातील कौसडी येथेही गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोरी पोलिसांनी कारवाई केली.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis