रत्नागिरी बनणार आता ‘बालस्नेही जिल्हा’
रत्नागिरी, 21 सप्टेंबर (हिं.स.) । बालकांच्या शैक्षणिक सुविधा आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वांगीण ‘बालस्नेही जिल्हा’ म्हणून विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत सं
रत्नागिरी बनणार आता ‘बालस्नेही जिल्हा’


रत्नागिरी, 21 सप्टेंबर (हिं.स.) । बालकांच्या शैक्षणिक सुविधा आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वांगीण ‘बालस्नेही जिल्हा’ म्हणून विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत संगमेश्वर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून, येथे बालस्नेही ग्रामपंचायत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बालकांचे हक्क अबाधित राखून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बालस्नेही ग्रामपंचायत योजनेच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा विभागांत बालहक्क संरक्षण आयोगामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचा समावेश केला आहे.विविध प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून अडचणीत सापडलेल्या बालकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविणे, बालकांचे प्रश्न थेट ग्रामपंचायतीच्या निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करणे आणि त्यांना सुरक्षित व पोषक वातावरण उपलब्ध करून देणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

उपक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य मनोज जंगम यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बालकल्याण अधिकारी मनोज पाटणकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बालहक्कांचे रक्षण, संवर्धन आणि प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या एकूण निधीपैकी काही रक्कम बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळ आणि मनोरंजनासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘बालस्नेही अर्थसंकल्प’ तयार केला जाईल. शंभर टक्के शाळाप्रवेश, बालगुन्हेगारीचे निर्मूलन, पूर्ण लसीकरण, बालविवाह व बालमजुरी रोखणे तसेच लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. महिला व बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त सहभागातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘बालस्नेही पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande