
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शासकीय भरती परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाला समिती शिफारशी सादर करेल. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण, पेपर तपासणी, सामान्यीकरण, निकाल, न्यायालयीन प्रकरणे आणि नियुक्ती प्रक्रिया अशा विविध मुद्यांचा अभ्यास करून ह्या शिफारशी समिती सुचवेल, अशी माहिती भरती परीक्षा उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.
भरती परीक्षा सुधारण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि सदस्य तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
श्रीमती व्ही. राधा यांनी पत्रकारांना माहिती दिली की, समितीने आतापर्यंत पुणे, नागपूर आणि अमरावती येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधला आहे. पुण्यात सुमारे ६००, नागपुरात ३५० आणि अमरावतीत ८००, अशा सुमारे १ हजार ७५० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच समितीला २० हजारांहून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून, समितीने दिलेल्या ई-मेलवर १ हजार ४०० हून अधिक जणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदने दिली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींचे निश्चित वेळापत्रक असावे, अशी प्रमुख मागणी केली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis