
नंदुरबार, 21 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय असल्यास नागरिकांनी त्याबाबत अन्न व औषध
प्रशासनाकडे तक्रार करावी. यासाठी ऑनलाइन तक्रार पोर्टल, कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क अथवा टपालाद्वारे
तक्रार करता येते. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे यांनी दिली.
लोकसंवाद-2026’ तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने
करजई (ता.शहादा) येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफळे, पोलीस पाटील
पुरुषोत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्रीमती गोडसे म्हणाल्या की, जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळीची ऑनलाइन तक्रार
पोर्टलवर तक्रार नोंदविताना येते. तक्रारदाराची गोपनीयता जपली जाते. तक्रारदाराचे नाव व दूरध्वनी
क्रमांक प्रशासनाकडील संबंधित यंत्रणेलाही उपलब्ध होत नसल्याने तक्रारदाराची माहिती सुरक्षित ठेवली
जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता वस्तुनिष्ठ तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन
करण्यात आले आहे. वैयक्तिक वाद, व्यावसायिक स्पर्धा किंवा कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रारी न
करता अन्न सुरक्षेशी संबंधित वास्तविक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात. प्राप्त तक्रारीची योग्य ती
पडताळणी करून नियमानुसार कारवाई केली जाते.
संशयास्पद खवा, मिठाई किंवा अन्य अन्न पदार्थ आढळल्यास प्रशासनाकडून त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत
तपासणी केली जाते. तपासणीत दोष आढळल्यास नियमानुसार दंडात्मक अथवा अन्य योग्य कारवाई
करण्यात येते. अन्न पदार्थाचा साठा अत्यंत संशयास्पद आढळल्यास तो जप्त करून नष्ट करण्याची कारवाईही
केली जाऊ शकते.
लग्न समारंभासाठी केटरर्सची नोंदणी तपासावी
लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांसाठी केटरर्सची सेवा घेताना संबंधित व्यावसायिकाकडे अन्न परवाना
अथवा नोंदणी आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच केटरिंगच्या ठिकाणी मूलभूत स्वच्छता पद्धतींचे
पालन केले जाते की नाही, याकडेही आयोजकांनी लक्ष द्यावे. अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींनी हेअर कॅप,
आदींचा वापर करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, स्वच्छ परिस्थितीत अन्न तयार करणे तसेच चांगल्या
दर्जाचा कच्चा माल वापरणे आवश्यक आहे. याबाबत काही संशयास्पद आढळल्यास नागरिकांनी तातडीने
अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलीस पाटील श्री.पाटील म्हणाले की, करजई गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना गेल्या पाच
वर्षांपासून राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात लहान आकाराची मूर्ती स्थापन करून भजन,
लहान मुलांचे विविध कार्यक्रम, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो.
‘एक गाव, एक गणपती’सारख्या उपक्रमांना शासनस्तरावर प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या
गावांचा गौरव करण्यात यावा. त्यामुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळून गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध,
सामाजिक व सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी,
व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर