जळगाव जिल्हा बँकेच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीचे प्रयत्न
जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रमुख प
जळगाव जिल्हा बँकेच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीचे प्रयत्न


जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे, यासाठी जळगावच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातून हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पुतळा अनावरण सोहळ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शरद पवार यांच्या वेळापत्रकानुसार आणि सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रमाची तारीख व वेळ निश्चित करून द्यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली असली, तरी अनावरण सोहळ्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे शरद पवार या सोहळ्यास उपस्थित राहणार का, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या भेटीत केवळ पुतळा अनावरण सोहळ्यापुरती चर्चा न होता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावरही चर्चा झाली. बँकेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शेतकरी व ग्रामीण भागाशी असलेले आर्थिक संबंध तसेच सहकार क्षेत्रातील बँकेची वाटचाल याबाबत शरद पवार यांनी आढावा घेतला.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. याशिवाय आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांची माहिती शरद पवार यांना दिली.

भेटीदरम्यान शरद पवार यांनी माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande