शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्स ५६४ अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)। जागतिक पातळीवर रोखे परताव्यात नरमाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार असतानाही खरेदीचा
Stock Market Closing


नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (हिं.स.)। जागतिक पातळीवर रोखे परताव्यात नरमाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार असतानाही खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली वाढ नोंदवली. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या नफावसुलीमुळे बाजार काहीसा खाली आला. दिवसअखेर सेन्सेक्स ५६४.०३ अंक म्हणजेच ०.७६ टक्क्यांनी वाढून ७४,८५८.९९ अंकांवर, तर निफ्टी ६७.९० अंक म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी वाढून २३,४१४.३० अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४०.२२ अंकांच्या वाढीसह ७४,५३५.१८ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात खरेदी आणि विक्रीचा दबाव आलटून-पालटून दिसून आला. एका टप्प्यावर सेन्सेक्स ७४,४५४.१८ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निर्देशांकाने वेग घेतला. दुपारी दोनच्या सुमारास सेन्सेक्स ६९२.४४ अंकांनी उसळी घेत ७४,९८७.४० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर नफावसुलीमुळे काहीशी घसरण झाली आणि तो ७४,८५८.९९ अंकांवर स्थिरावला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६.२० अंकांच्या घसरणीसह २३,३३०.२० अंकांवर उघडला. सुरुवातीला खरेदीचा आधार मिळाल्याने तो २३,४१०.७५ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निफ्टी २३,३१४.८० अंकांपर्यंत घसरला. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा खरेदी सुरू झाल्याने निफ्टीमध्ये सुधारणा झाली. दुपारी दोनच्या सुमारास तो २३,४६६.८० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अखेर नफावसुलीमुळे काहीशी घसरण होऊन निफ्टी २३,४१४.३० अंकांवर बंद झाला.

दिवसभर रिअल्टी आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. त्याचबरोबर एफएमसीजी, औषधनिर्मिती, बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, तेल व वायू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांतही वाढ झाली. दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान आणि धातू क्षेत्रातील समभागांवर दबाव राहिला. व्यापक बाजारात मात्र विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.२९ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.०७ टक्क्यांनी घसरला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांतील घसरणीमुळे बाजारातील तेजी असूनही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे सहा हजार कोटी रुपयांची घट झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी ४८१.६१ लाख कोटी रुपयांवरून सोमवारी ४८१.५५ लाख कोटी रुपयांवर आले. सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग वाढीसह, तर सहा समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ३० शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले आणि २० शेअर्स रेड झोनमध्ये बंद झाले. एटरनल २.७७ टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजी २.५४ टक्के, आयटीसी १.७९ टक्के, सन फार्मास्युटिकल्स १.७२ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीज १.७१ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल ३.३३ टक्के, अदानी पोर्ट्स २.०२ टक्के, बजाज फायनान्स १.८३ टक्के, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन १.५५ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेस १.४९ टक्क्यांनी घसरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande