
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यालयी वास्तव्याच्या मुद्द्यावरून शिक्षकांवर करण्यात आलेली दंडात्मक कारवाई रद्द करण्याची मागणी शिक्षक समन्वय समितीने खासदार संदिपान भुमरे यांच्याकडे केली.
गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील तब्बल १ हजार ८६ शिक्षकांवर एकतर्फी कारवाई करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे समितीने सांगितले. यावेळी भुमरे यांनी ४० वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती बदलली असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक वेळेत शाळेत उपस्थित राहत असतील तर केवळ मुख्यालयी वास्तव्याच्या कारणावरून कारवाई करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भुमरे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुख्यालयी वास्तव्याची अट आणि ग्रामसभेच्या ठरावाची अट रद्द करण्याबाबत लवकर निर्णय घेण्याची ग्वाही देण्यात आल्याची माहिती समितीने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis