अटी मान्य होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार नाही; इराणचा अमेरिकेला थेट इशारा
तेहरान, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिका तेहरानच्या अटी मान्य करत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार नाही.
अटी मान्य करत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार नाही; इराणचा अमेरिकेला थेट इशारा


तेहरान, 21 सप्टेंबर (हिं.स.)।पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिका तेहरानच्या अटी मान्य करत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार नाही. तसेच अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेचा विचारही केला जाणार नाही. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी ही माहिती दिली आहे.

गालिबाफ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणने मध्यस्थांच्या माध्यमातून आपल्या मागण्या आणि अटी अमेरिकेपर्यंत स्पष्टपणे पोहोचवल्या आहेत. जोपर्यंत इराणच्या अटी पूर्ण होत नाहीत, इराणी जनतेच्या मूलभूत अधिकारांना मान्यता दिली जात नाही आणि अमेरिका आपल्या बांधिलकीची पूर्तता करत नाही, तोपर्यंत चर्चेच्या जुन्या चौकटीत परतण्याची किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची कोणतीही शक्यता नाही.

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी तणावाचे प्रमुख केंद्र बनली आहे. हा समुद्री मार्ग जगभरातील ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील सागरी वाहतुकीवर निर्बंध लादल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तेलाच्या पुरवठ्यात आणखी अडथळे निर्माण होण्याची चिंता वाढली आहे.

गालिबाफ यांच्या वक्तव्यानंतर इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडनेही अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणच्या खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने सरकारी वृत्तसंस्थांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकेने तेहरानविरोधात पुन्हा लष्करी कारवाई केली, तर पश्चिम आशियातील अमेरिकी लष्करी तळ आणि अमेरिकी हितसंबंधांना लक्ष्य केले जाईल.

इराणी लष्करी कमांडने म्हटले आहे की, “अमेरिकेने इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणविरोधात कोणतीही चूक केली, तर या प्रदेशातील त्यांचे सर्व तळ आणि हितसंबंध कोणतीही मर्यादा किंवा विचार न करता सातत्यपूर्ण, प्रभावी आणि वेदनादायक हल्ल्यांचे लक्ष्य बनवले जातील.”

इराणच्या लष्करी कमांडने या प्रदेशातील त्या देशांनाही इशारा दिला आहे, जे अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी कारवाईत त्याला साथ देतील. अशा देशांना या कारवाईतील भागीदार मानले जाईल आणि इराणी लष्कराकडून त्यांच्याविरोधात कोणत्याही संयमाची अपेक्षा करू नये, असे इराणने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडने सांगितले आहे की, इराणवर लादण्यात आलेली नौदल नाकेबंदी लागू करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांच्या सैन्याने १०९ व्यापारी जहाजांचा मार्ग बदलला आहे. अमेरिकी लष्कराने १४ जुलै रोजी इराणच्या बंदरांमधून ये-जा करणाऱ्या सागरी वाहतुकीवर नौदल नाकेबंदी लागू करण्याची कारवाई पुन्हा सुरू केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने आपली भूमिका न बदलल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र, त्यांनी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी चर्चा करण्यास आपण तयार असू शकतो, असेही संकेत दिले आहेत.

यापूर्वी इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसिन रजाई यांनी सांगितले होते की, कतारच्या मध्यस्थीच्या माध्यमातून तेहरानने संघर्ष समाप्त करण्यासाठी आपल्या अटी अमेरिकेपर्यंत पोहोचवल्या आहेत. या अटींमध्ये सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवणे, इराणची जप्त करण्यात आलेली संपत्ती मुक्त करणे आणि अमेरिकी नौदल नाकेबंदी समाप्त करणे यांचा समावेश आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अशा वेळी वाढला आहे, जेव्हा पश्चिम आशियातील अस्थिरताही वाढत आहे. अलीकडेच हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर अमेरिकेने पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये आपल्या नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये परिस्थिती झपाट्याने बिघडण्याची, विमानसेवा विस्कळीत होण्याची आणि अमेरिकी हितसंबंधांवर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी जगभरातील नेते सध्या न्यूयॉर्कमध्ये एकत्र येत आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख चिंतेचे विषय बनले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande