
प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका, परीक्षा केंद्रे आणि निकाल प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या विद्यार्थ्यांच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, 21 सप्टेंबर (हिं.स.) : परीक्षा पद्धतीत सातत्य राखावे आणि त्यात बदल करणे आवश्यक असल्यास उमेदवारांना पुरेसा अवधी द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा सुधारावा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशा सूचनाही विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
परीक्षा केंद्रांसाठी किमान सुविधा व आवश्यक निकष निश्चित करणे, पर्यवेक्षकांची योग्य निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे, तसेच निकाल व नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (एमपीएससी) संबंधित न्यायालयीन प्रकरणे आणि भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचाही सविस्तर अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षित परीक्षा व्यवस्था
परीक्षा
ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने घेतली तरी गैरप्रकारांना प्रतिबंध करणारी सुरक्षित व्यवस्था असावी, यावर भर देण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी विविध राज्यांतील तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास केला जाणार आहे.परीक्षा केंद्रांसाठी किमान सुविधा, पर्यवेक्षकांची निवड व प्रशिक्षण, प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि परीक्षा संचालनासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतही विचार केला जाणार आहे. विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास गुणांचे सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) करण्याची पद्धत स्पष्ट असावी, यासाठी संबंधित संस्थांच्या कार्यपद्धतींचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
परीक्षा रद्द झाल्यास स्पष्ट कार्यपद्धती
परीक्षा रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित असावी. तसेच परीक्षा प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे हित सुरक्षित राहील, याचीही काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.निकाल, प्रतीक्षा यादी आणि नियुक्त्या वेळेत पूर्ण करण्यासोबतच परीक्षा प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला जाणार आहे. परीक्षा वेळेत न झाल्यामुळे उमेदवारांचे वयोमर्यादेच्या दृष्टीने नुकसान होत असल्यास त्याबाबतही योग्य तो विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis