रत्नागिरी : संगमेश्वर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी उंदीरमामाचे आंदोलन
रत्नागिरी, 21 सप्टेंबर (हिं.स.) । संगमेश्वर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी उंदीरमामाचे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. वांद्रे–मडगाव, श्री गंगानगर, अजमेर–एर्नाकुलम आणि जबलपूर–कोईमतूर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर उंदीर मामाचे आंदोलन


रत्नागिरी, 21 सप्टेंबर (हिं.स.) । संगमेश्वर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी उंदीरमामाचे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. वांद्रे–मडगाव, श्री गंगानगर, अजमेर–एर्नाकुलम आणि जबलपूर–कोईमतूर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी या उंदराने केली आणि स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत नोंद केली.

गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. १०११५/१०११६ वांद्रे–मडगाव, १६३११/१६३१२ श्री गंगानगर, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोईमतूर एक्स्प्रेस या चार साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, आता मुंबईसह अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर रोड स्थानकावर प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन विविध महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

चारही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील विविध भागांकडे प्रवासासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी आणि संगमेश्वर रोड स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या चारही साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना लवकरात लवकर थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande