
तीन प्रकारांत प्रथम क्रमांक; दोन विद्यार्थी राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी पात्र
जळगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) : बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कान्हा ललित कला केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने विविध कलाप्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अनुभूती स्कूलचा समूह तसेच दोन एकल प्रकारातील विद्यार्थी लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत.
अनुभूती स्कूलच्या संघाने समूह लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकल लोकवादनात यशोदीप थोरात आणि एकल लोकगीत प्रकारात आराध्य खैरनार यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी आपली निवड निश्चित केली. एकल लोकनृत्य प्रकारात तनुश्री दांडगे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत समूह लोकनृत्य, एकल लोकवादन आणि एकल लोकगीत या तीन प्रकारांत अनुभूती स्कूलने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर समूह लोकगीत आणि एकल लोकनृत्य या प्रकारांत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धेत समूह लोकनृत्य प्रकारात २३ संघ, एकल लोकगीतासाठी ८ स्पर्धक, एकल लोकवादनासाठी ८ स्पर्धक, समूह लोकगीतासाठी ६ संघ आणि एकल लोकनृत्यासाठी २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली कलागुणांची छाप उमटवली.
या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, संगीत शिक्षक भूषण खैरनार यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर दीपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी आणि उद्योजक रजनिकांत कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर