करमाळ्यात पाणीप्रश्न गंभीर; १३ गावांना टँकरने पाणीपुरवठा
सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। करमाळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने १३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावांना ८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्र
tankar


सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। करमाळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने १३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या गावांना ८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, विहिरी, बोअरवेल तसेच अन्य जलस्रोतांची पाणीपातळी खालावली आहे.पावसाळ्याचा कालावधी पुढे सरकत असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.

घोटी, शेलगाव (क), सरफडोह, निंभोरे, अंजनडोह आणि देलवडी या गावांमध्ये विहिरींचे पाणी आटले असून, उपलब्ध जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे.वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, पाणीटंचाईचा फटका शेतकरी, पशुपालक तसेच जनावरांनाही बसत आहे.दरम्यान, पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. उपलब्ध जलस्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा तसेच अन्य आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande