राज्यात १५.४८ लाख हेक्टरवर ऊस; उपलब्धतेच्या अंदाजापेक्षा कमी ऊस मिळण्याची शेतकरी संघटनेची भूमिका
सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाच्या अनिश्चिततेचा यंदा राज्यातील ऊस उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ लाख ४८ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असून, त्यापासून ९९०.७२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी मिळण्याचा अं
sugar mill


सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।

पावसाच्या अनिश्चिततेचा यंदा राज्यातील ऊस उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ लाख ४८ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असून, त्यापासून ९९०.७२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्षात या अंदाजापेक्षा कमी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने आगामी गाळप हंगामात साखर उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळत आहेत.

पावसाळा संपत आला असतानाही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाच्या लहरीपणाबरोबरच सिंचनाची अपुरी उपलब्धता यामुळे ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या ऊस क्षेत्रापैकी प्रत्यक्ष गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होतो, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.कृषी विभाग आणि मिटकॉन यांनी संयुक्तपणे २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी केलेल्या नियोजनात राज्यात १५.४८ लाख हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. त्यातून ९९०.७२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मात्र, पावसाची स्थिती आणि पिकाच्या वाढीचा विचार करता प्रत्यक्ष उपलब्धता या अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ऊस उपलब्धता कमी झाल्यास आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी चढाओढ करावी लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऊसदराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या कारखान्याकडून सर्वाधिक दर जाहीर केला जाईल, त्याच कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केले आहे.“पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा राज्यातील साखर कारखान्यांना कमी प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारखानदारांमध्ये ऊस घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागेल. शेतकऱ्यांनी जो कारखाना सर्वाधिक दर जाहीर करेल, त्याच कारखान्याला ऊस घालावा.” असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande