
धाराशिव, 21 सप्टेंबर (हिं.स.)। आता कागदी आढावा नको, शेताच्या बांधावर या!’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला केले. “डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे सोयाबीन जळत आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शासनाने आता केवळ कागदोपत्री आढावे घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी,” अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली.
शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कळंब तालुक्यात (धाराशिव) तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पीकविम्याची रक्कम अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांना ती तातडीने अदा करावी, येत्या पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या गावांमध्ये झाली प्रत्यक्ष पीक पाहणी
कळंब तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभी सोयाबीन पिके करपून जात आहेत. शेतात खर्च केलेला पैसा आणि घाम वाया जाण्याची वेळ आली असताना शासन मात्र पंचनामे, आढावे आणि कागदी अहवालांच्या चौकटीत अडकले आहे. या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. रत्नापूर, दुधाळवाडी, चोराखळी, मस्सा (खं.), आंदोरा आणि हावरगाव परिसरातील शेतांमध्ये जाऊन रोहित पवार यांनी सोयाबीनसह खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पावसाअभावी सुकून करपलेली पिके, शेतातील परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.
डोळ्यादेखत पीक जळतंय; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू!
मशागत, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी उभे केलेले सोयाबीन पीक पावसाअभावी संकटात आले आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, उभे पीक सुकून करपण्यास सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पावसाअभावी झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis