
सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)। नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका हद्दीतील शासकीय आरोग्य संस्थांसह जिल्ह्यातील ५६६ रुग्णालयांना आपत्कालीन अग्निसुरक्षा परीक्षण अर्थात फायर ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात २१ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आहेत. या सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचा फायर ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयांमध्ये आगीची घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, कर्मचारी तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अग्निसुरक्षा परीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, सुरक्षा उपाययोजना आणि आग प्रतिबंधक व्यवस्थेचे मूल्यांकन या माध्यमातून करण्यात येणार आहे. फायर ऑडिट पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित रुग्णालयांनी सादर करणे आवश्यक आहे.यासाठी सर्व ५६६ रुग्णालयांना निश्चित कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत फायर ऑडिट पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने या निर्णयामुळे सुरक्षा उपाययोजनांना चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड