
सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता वेग घेणार आहे. निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन दीपावलीच्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अर्हता दिनांकाच्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली असून, ती सोमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येतील.हरकती व सूचनांवर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष वेग येणार आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार यादी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे प्रारूप यादीत कोणत्या संस्था आणि मतदारांचा समावेश करण्यात आला आहे, कोणत्या नावांवर हरकती दाखल होतात आणि त्यावर निवडणूक यंत्रणा काय निर्णय घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड