
अमरावती, 22 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व वाहतूक कार्यासाठी वापरण्यात येणारी तब्बल १०० वाहने अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित कंपनीने राजापेठ पोलीस स्टेशनला केली आहे. ही वाहने कचरा संकलनासाठी झोन क्रमांक १, २, ३ व ५ मध्ये कार्यरत होती. १९ सप्टेंबर रोजी सकाळी कचरा वाहतुकीसाठी गेलेली ही वाहने सायंकाळी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, सर्वत्र चौकशी करूनही वाहने मिळून न आल्याने ती चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित कंपनीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, कंपनीला अमरावती मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन व वाहतूक कामाची निविदा मिळाल्यानंतर जानेवारी २०२६ पासून काम सुरू करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या सूचनेनुसार काही स्थानिकांकडील घनकचरा व्यवस्थापनाची वाहने खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. संबंधित वाहनांवर वित्तीय संस्थांचे कर्ज असल्याने कंपनीच्या नावावर तत्काळ हस्तांतरण शक्य झाले नाही. त्यामुळे कंपनीने वाहन विक्रेत्यांना धनादेश व आरटीजीएसद्वारे मोबदला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये श्री नागरिक सेवा सहकारी संस्थेची ६० घंटागाडी, श्री तुळजाई ट्रान्सपोर्टर्सची १२ घंटागाडी व ४ऑटोरिक्षा, गोविंदा सफाई कामगार कोणार्क नागरिक सेवा सहकारी संस्थेची १८ घंटागाडी आणि सुशिक्षित बेरोजगारांची एनएनएसएसएम संस्थेची ६ घंटागाडी अशी एकूण १०० वाहने असल्याचे सांगण्यात आले आहे.
वाहन नोंदणीधारकांकडून तक्रार देण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याने कंपनीने स्वतः पोलिसांत धाव घेतली आहे. वाहनांचा मोबदला आपण अदा केला असल्याने तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, वाहने बेपत्ता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकरणाची तातडीने चौकशी करून वाहने शोधावीत तसेच चोरीस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कंपनीने राजापेठ पोलिसांकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी